महाराष्ट्रात 264 नगरपरिषद, नगरपंचायतीत आज मतदान, राज्यातील मतदार कोणाला कौल देणार?
महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणूक 2025 मुंबई : महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (2 डिसेंबरला) मतदान होणार असून, त्यासाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 12 हजार 316 मतदान केंद्रांसाठी 62 हजार 108 निवडणूक अधिकारी/ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
Nagar Parishad and Nagar Panchayat Election : 264 नगरपालिका, नगर पंचायतीत मतदान
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या जागांसाठी उद्या मतदान होईल. संपूर्ण निवडणूक प्रकियेसाठी पुरेशा मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात एकूण 17 हजार 367 कंट्रोल युनिट; तर 34 हजार 734 बॅलेट युनिटचा समावेश आहे. अधिकारी/ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली मतदान पथके मतदान केंद्रावर सुरळित पोहचली आहेत. उद्या सकाळी 7.30 वाजता मतदानास सुरुवात होईल. सांयकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. आता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार नाही. तेथे सुधारित कार्यक्रमानुसार 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उद्या मतदान होईल. त्यातील 76 नगरपरिषदा व नगरपंचायतींमधील न्यायालयीन प्रकरणांमुळे बाधित 154 जागांसाठीदेखील मतदान होणार नाही. तिथेही सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित बाधित जागांसाठी 20 डिसेंबर 2025 रोजी मतदान होईल.
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला. प्रचाराची मुदत यावेळी निवडणूक आयोगानं 1 डिसेंबर रोजी रात्री 10.00 वाजेपर्यंत वाढवली होती. आता आज नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या 264 अध्यक्षपदांच्या आणि 6 हजार 42 सदस्यपदांच्या निवडणुकीसाठी मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात हे पाहावं लागेल. 2 डिसेंबरला मतदान पार पडल्यानंतर या ठिकाणी 3 डिसेंबरला मत मोजणी होणार आहे.
24 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबरला मतदान :
24 नगरपरिषदा व नगरपंचायतींची जिल्हानिहाय नावे: ठाणे– अंबरनाथ. अहिल्यानगर- कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी व नेवासा. पुणे– बारामती व फुरसुंगी- उरुळी देवाची. सोलापूर- अनगर व मंगळवेढा. सातारा- महाबळेश्वर व फलटण. छत्रपती संभाजीनगर- फुलंब्री. नांदेड- मुखेड व धर्माबाद. लातूर– निलंगा व रेणापूर. हिंगोली- बसमत. अमरावती- अनंजनगाव सूर्जी. अकोला– बाळापूर. यवतमाळ- यवतमाळ. वाशीम- वाशीम. बुलढाणा– देऊळगावराजा. वर्धा- देवळी. चंद्रपूर-घुग्घुस.
आणखी वाचा
Comments are closed.